You are currently viewing नेपाळ येथे सुभाष कुल महाविद्यालय आयोजित करणार आंतरराष्ट्रीय चर्चासत्र 

नेपाळ येथे सुभाष कुल महाविद्यालय आयोजित करणार आंतरराष्ट्रीय चर्चासत्र 

दौंड, ता.२ : दौंड तालुक्यातील केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय व त्रिभुवन विश्वविद्यालय काठमांडू नेपाळ, पैंन्जिया जिओग्राफर असोसिएशन व महाराष्ट्र भूगोल परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मे २०२५ मध्ये त्रिभुवन युनिव्हर्सिटी भूगोल विभाग, काठमांडू नेपाळ येथे दक्षिण आशियाई देशातील पर्यावरणीय समस्या, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक व संस्कृती विकास, साधन संपदा विकास, भाषिक साधर्म्य, आर्थिक विकास, व्यापार विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. या चर्चासत्राच्या आयोजनात सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात श्रीलंका, नेपाल, भारत, बांगलादेश, पाकिस्तान, अमेरिका व विविध देशातील प्राध्यापक, भूगोल तज्ज्ञ, विद्यार्थी तसेच नागरिक सहभागी होणार आहेत.

तसेच यामध्ये विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. याचा उपयोग विकसनशील देशांना विकासाच्या दृष्टिकोनातून होणार आहे. सुभाष बाबुराव कुल शैक्षणिक विकास संकुल समितीचे प्रमुख डॉ.अशोक दिवेकर, पेंन्जिया जिओग्राफर असोसिएशन भारत यांचे सचिव संतोष माने, महाराष्ट्र भूगोल परिषदेचे चेअरमन डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी नुकतीच त्रिभुवन युनिव्हर्सिटी काठमांडू नेपाळ येथे भेट देऊन विविध विभागाची माहिती घेतली. यावेळी त्रिभुवन विश्वविद्यालयाचे रजिस्टार डॉ.केदार रिजल, डॉ.प्रोफेसर उमेश कुमार मंडल, भूगोल विभाग प्रमुख यांनी भारतीय भूगोलतज्ञांना पशुपतिनाथ मंदिराची प्रतिकृती देऊन सन्मानित करून विशेष आभार मानले.

संयुक्तिकरित्या आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्रिभुवन विश्वविद्यालय पूर्णपणे सहकार्य करेल याची ग्वाही दिली व सामंजस्य करारावर सकारात्मक निर्मितीवर चर्चा केली. भविष्यात त्रिभुवन विश्वविद्यालय व सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयांमध्ये सामंजस्य करारानुसार शैक्षणिक मूल्यांचे आदान-प्रदान केले जाईल. यामुळे दोन्ही शैक्षणिक संकुलांना उच्च शिक्षणातील उद्दिष्ट पूर्तीसाठी मदत होईल अशी माहिती महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ.अशोक दिवेकर यांनी दिली. डॉ.अशोक दिवेकर यांच्या प्रयत्नामुळे महाविद्यालयाच्या विकासात व नावलौकिकत भर पडत असल्यामुळे प्राचार्य डॉ.नंदकुमार जाधव, आय. क्यू .ए .सी प्रमुख डॉ.राजेंद्र गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके, सचिव धनाजी शेळके, कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.